मुंबई-शहरातील नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून शीतल साळवी यांचे ५ दिवसांचे बाळ एका महिलेने पळवून नेले होते. यानंतर काही तासातच बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध मुंबई पोलिसांच्या अग्रीपाडा पोलिसांनी लावला. एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे बाळ चोरणारी महिला पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. स्नेहल मंदार राणे असे त्या महिला सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
स्नेहल राणे या गेली ५ वर्षे मुंबईतील सांताक्रूज परिसरातील विएन देसाई रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी स्नेहल राणे रुग्णालयात रात्र पाळीला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता हेजल क्रोरिया या महिलेने नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून शीतल साळवी यांचे ५ दिवसांचे बाळ पळवून नेले होते. त्यानंतर हेजल क्रोरिया ही महिला बाळाला घेऊन विएन देसाई रुग्णालयात आली. यावेळी तिने महिला सुरक्षारक्षक स्नेहल राणे यांना सांगितले की, ती नालासोपऱ्यातून आली असून तिने या बाळाला घरातच जन्म दिला आहे. तसेच बाळाला व तिला रुग्णालयात दाखल करून घेण्याची विनंतीही केली.