मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मागच्या आठवड्यात सुरू झाले. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून सोबतच आज जागतिक महिला दिन असल्याकारणाने महिला धोरण आज जाहीर केले जाईल अशी शक्यता पहिल्यापासूनच शिंदे - फडणवीस सरकारने वर्तवली होती. परंतु महिला धोरण सध्या खोळंबले आहे. आता हे धोरण २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वच महिला आमदारांना निराश व्हावे लागणार आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा या अधिवेशनात महिला धोरण आणण्याचे सांगितले होते.
आज महिला प्रतिनिधींना विशेष संधी:आज महिला धोरण जरी जाहीर होणार नसले तरी महिला आमदारांना विशेष संधी कामकाजातून दिली जाणार आहे. आज तारांकित प्रश्न त्याचबरोबर लक्षवेधी सूचना व इतर प्रश्न महिला आमदारांना प्राथमिकतेने मांडण्याची संधी दोन्ही सभागृहात दिली जाणार आहे. यासाठी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या महिला दिनाच्या विशेष दिवशी तसा प्रस्ताव मांडणार आहेत. त्याचबरोबर महिलांना समाजात समान व सन्मानाचे स्थान भेटावे या अनुषंगाने आजच्या विशेष दिनी संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत जागतिक महिला आयोगाच्या ६७ व्या सत्राची घोषणा सुद्धा नार्वेकर करणार आहेत.