मुंबई/नागपूर Mangal Prabhat Lodha :आदिवासी समाजातील व्यक्तीने इतर धर्म स्वीकारला तर त्यांना आदिवासी समाजाला मिळणारे लाभ मिळू नये, अशा प्रकारची मागणी विधान परिषद सभागृहामध्ये भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे केली. आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. आदिवासी समाजाला आपला धर्म सोडून मुस्लिम किंवा इतर धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही डावखरे यांनी यावेळेस केला. तसेच वेगवेगळ्या प्रकारे भूलथापा देऊन, वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन देऊन आणि आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अंधश्रद्धेचा वापर करून धर्मांतर केले जात असल्याचा खळबळजनक दावा विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. तर धर्मांतर करून आदिवासी समाजाच्या सवलती लाटत असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. कारण अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या असून धर्मांतर विरोधी कायदा करणार का? असा सवालही पडळकर यांनी विधान परिषद सभागृहात केला.
निवृत्त कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार : आदिवासी धर्मांतराच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, आदिवासी धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला लाभ द्यायचा की, नाही याविषयी समिती स्थापन करून अभ्यास करणार आहे. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार कटिबद्ध आहे. आदिवासी समाजात धर्मांतर करून काही लोक आदिवासी समाजाला लाभांपासून वंचित ठेवत आहेत. मूळ आदिवासी समाज सोडून एखादा व्यक्ती धर्मांतर करतो तेव्हा तो अल्पसंख्यांकांचाही आणि आदिवासी समाजाचा देखील लाभ घेतो. अशावेळी आदिवासी समाजाच्या लाभांवर गदा येते. यासाठी कारवाईबाबतचा विचार केला जाईल.