मुंबई- वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा, वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वन महोत्सवाच्या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
वनमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले, राज्यात सुरू असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही चालू राहावा म्हणून 'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान' अंतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा क्षेत्रात सामुहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वसाधारण कालावधीत 9 महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप )15 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे 75 रुपयांना एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु, या वनमहोत्सवाच्या काळात 9 महिन्यांचे रोप केवळ 8 रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.