मुंबई -कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग लसीच्या तुटवड्यामुळे मंदावला आहे. तर, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगितच झाले आहे. अशावेळी ज्या नागरिकांचा सद्या पुढील काही दिवसांत दुसरा डोस बाकी आहे त्यांनाच प्राधान्यक्रमाने लस दिली जाणार आहे. असे लाभार्थी राज्यात अंदाजे 20 लाख असून सद्या उपलब्ध असलेले 20 लाख डोस याच नागरिकांसाठी वापरले जाणार असल्याची माहिती डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त संचालक, आरोग्य विभाग यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.
हेही वाचा -कोरोनाने घेतला 1 हजार 952 रेल्वे कर्मचाऱ्यांचा बळी
1 कोटी 94 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
16 जानेवारीपासून राज्यात लसीकरणाला टप्प्याटप्प्यात सुरवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 1 कोटी 94 लाख 43 हजार 54 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील 1 कोटी 54 लाख 49 हजार 582 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर, 39 लाख 93 हजार 472 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सुरवातीला कोरोना योद्धे, फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक त्यानंतर 45 वर्षांपुढील नागरिक, असे टप्प्या टप्प्यात लसीकरण सुरू झाले. तर, 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले. पण, या गटाचे लसीकरण सुरू होऊन 15 दिवसही होत नाहीत तोच या गटाचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. लसीचा प्रचंड तुटवडा आणि दुसरा डोस निश्चित वेळेत लाभार्थ्यांना देण्याचे आव्हान, तसेच अशा लाभार्थ्यांचा वाढता आकडा लक्षात घेता 18 ते 44 साठीचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. तर, दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितल.
सद्या 15 लाख कोविशिल्ड, 5 लाख कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध
1 कोटी 94 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यातील 1 कोटी 54 लाख नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे. नियमानुसार दुसरा डोस ठराविक कालावधीतच घेणे गरजेचे आहे. त्यापेक्षा अधिक काळ गेल्यास पहिल्या डोसचा काहीही परिणाम होत नाही. पण, राज्यात लसीचा प्रचंड तुटवडा असल्याने दुसरा डोस व नव्या लाभार्थ्यांना पहिला डोस देणे अवघड जात आहे. पण, सद्या दुसरा डोस येत्या 10/12 दिवसांत ज्यांना देणे बाकी आहे, त्यांना तो देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सद्या जो काही लसीचा साठा उपलब्ध आहे तो याच दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच वापरण्यात येणार आहे. त्यानुसार सद्या राज्याकडे 5 लाख डोस कोव्हॅक्सिनचे, तर 15 लाख डोस कोविशिल्डचे आहेत. तेव्हा हे सर्व डोस दुसरा डोस शिल्लक असणाऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. एकूणच 20 लाख नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा -मुंबईत ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शनचा तुटवडा, आरोग्य विभागासमोर 'म्युकरमायकोसिस' आव्हान