मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक हिरेन मनसुखानी याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील रेती बंदर खाडीजवळ हा मृतदेह आढळून आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वझे या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
सचिन वझे कोण?
2 डिसेंबर 2002मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. 2 डिसेंबर 2002ला मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी 27 वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनुस यास वाहनाने घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार, ख्वाजा युनूस अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्यानंतर 2003पासून त्यांच्यावर याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता.
जून 2020मध्ये पुन्हा पोलीस सेवेत दाखल -
पोलीस कस्टडीतून ख्वाजा युनूस पळून गेल्याचे या तपासादरम्यान आढळून आल्यानंतर ख्वाजा युनूस याचा कुठलाही पत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, सचिन यांच्यावर लावण्यात आलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून त्यांना पुन्हा मुंबई पोलीस खात्यामध्ये सामावून घेण्यात आले आहे. सध्या सचिन वझे या अधिकाऱ्याची नेमणूक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत (सीआययु) करण्यात आली आहे. तर 2003 नंतर अजूनही ख्वाजा युनूस याचा तपास लागलेला नाही. दरम्यान, ख्वाजा युनूस यास तपासासाठी सचिन वझे व इतर पोलीस कर्मचारी घेऊन जात असताना ही घटना घडली होती. मुंबई पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन वझेंना 6 जून 2020ला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी निलंबित असताना सचिन वझे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून शिवसेनेच्या काही पदांवर कामसुद्धा केले आहे.
हेही वाचा -अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप; तपास NIA कडे सोपवण्याची मागणी
दरम्यान, पोलीस खात्यात पुन्हा रुजू झाल्यानंतर सचिन वसई आणि क्राइम ब्रांचमध्ये काम करत असताना टीआरपी स्कॅम संदर्भात तपास केला आहे. तसेच 100 कोटींच्या वाहन कर्ज घोटाळ्यासंदर्भात दिलीप छाब्रिया यास अटकही सचिन वझे यांनीच केली होती. याबरोबरच मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ वाहनाच्या संदर्भातही तपास वझे यांच्याकडून केला जात आहे.