महाराष्ट्र

maharashtra

Aapda Mitra : 'आपदा मित्र' संकल्पना होतेय यशस्वी; विद्यार्थ्यांना मिळतेय आपत्कालीन परिस्थितीतील प्रशिक्षण, नेमका काय आहे उपक्रम?

By

Published : Mar 25, 2023, 10:03 PM IST

Updated : Mar 25, 2023, 10:47 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण नागरिकांना, शाळेतील मुलांना दिले जात आहे. त्याचसोबत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही हे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'आपदा मित्र' म्हणून ओळखले जाते. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळत असल्यामुळे मुंबईकरांना याचा फायदा होत आहे. यामुळे 'आपदा मित्र' संकल्पना यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

Aapda Mitra
आपदा मित्र

मुंबई : मुंबईमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या आपत्कालीन घटना घडतात. या घटना घडल्यावर त्वरित मदत पोहचावी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. कॉलेजचे विद्यार्थी घटनास्थळी त्वरित पोहचून नागरिकांना लागणारी मदत करत असल्याने याचा फायदा मुंबईकरांना होत आहे. यामुळे "आपदा मित्र" संकल्पना यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.

नेमका काय आहे उपक्रम :मुंबईमध्ये आगी लागणे, इमारत घर दरडी कोसळणे, रस्त्यावर अपघात आदी दुर्घटना घडत असतात. अशा दुर्घटनास्थळी बचाव पथके पोहचतात. परंतु त्याआधी आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरिकांनी मदत केल्यास अनेकांचे जीव वाचवता येऊ शकतात. यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण नागरिकांना, शाळेतील मुलांना दिले जात आहे. त्याचसोबत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही हे प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना "आपदा मित्र" म्हणून ओळखले जाते.

आपत्कालीन परिस्थितीत मदत : करीरोड रेल्वे स्थानकाजवळ एका मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन प्रवाशांचा अपघात झाला होता. बघ्यांची गर्दी होती. या ठिकाणाहून आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी जात होते. त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्वरित ऍम्ब्युलन्स आणि पोलिसांना माहिती दिली. या दोघांना रुग्णालयात भरती करण्यास मदत केली. त्याचप्रमाणे दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क मैदानात एक ५७ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. हा व्यक्ती त्याच ठिकाणी कोसळला. या व्यक्तीला त्वरित विशाल वाघचौरे नावाच्या आपदा मित्राने प्रथोमपचार देऊन त्या व्यक्तीला एम्बुलन्स बोलावून सायन रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मालाड येथे झोपड्याना मोठी आग लागली होती. त्यावेळीही आपदा मित्रानी नागरिकांना मदत केली होती.

विद्यार्थ्यांचीच नियुक्ती का? : एखादी परिसरात काही घटना घडल्यास महाविद्यालयीन विद्यार्थी कधीही उपलब्ध होतात. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आपदा मित्रांना ओळखपत्र आणि कीट देण्यात आले आहे. या किटमध्ये प्रथमोपचार साहित्य, हेल्मेट, लाईफ जॅकेट आदी वस्तुंचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आपदा मित्रांची नावे आणि संपर्क क्रमांक इमारतींमध्ये लावली जाणार आहेत. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्वरित मदत मिळणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी दिली.

हे बनू शकतात आपदा मित्र : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा या २ जिल्ह्यांच्या आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांमार्फत बृहन्‍मुंबईतील नागरिकांना सहभागी होता येईल, असा ‘आपदा मित्र’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. १२ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम (रविवार वगळून) आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या परळ येथील आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्‍यात आला आहे. कमीत कमी ७ वी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवासी यासाठी अर्ज करु शकतात. संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल करण्यात येतील, अर्ज करणा-या व्यक्तीला फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा : PM Security Breach : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षे्त पुन्हा मोठी चूक; ताफ्यात शिरण्याचा केला प्रयत्न, पाहा VIDEO

Last Updated : Mar 25, 2023, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details