मुंबई- राज्यात पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेषत: मुंबई, रायगड, ठाणे या जिल्ह्यात या घटनांचे प्रमाण जास्त आहे. आज भिंवडीच्या पटेल कंपाऊंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक नागरिकांनी इमारतीमधील 20 जणांना बाहेर काढले आहे. अद्याप २० ते २५ लोक ढिगाऱ्या खाली अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधीही राज्यात इमारती कोसळल्या होत्या. याबाबतचा आढावा
या दुर्घटनेप्रमाणे राज्यात यापूर्वीही इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्येही अनेकांचे जीव गेले. अनेकांना अपंगत्व आले आहे. तर कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आज भिंवडीत इमारत कोसळल्याची घटना घडली. त्याच अनुषंगाने मागील काळात राज्यात रायगड, मुंबई, ठाणे, या ठिकाणी इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.
इमारत कोसळल्याच्या घटना-
*रायगड - जिल्ह्यातील महाड येथे 24 ऑगस्टला तारिक गार्डन ही पाच मजली निवासी इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 16 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत २ जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले. घटनेतील मृतांच्या वारसांना वारसांना मदत देण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी 64 लाख रुपये मंजूर केले आहेत.
*मुंबई- नागपाडा येथील मिश्रा मॅन्शन इमारतीचा भाग 27 ऑगस्ट 2020ला कोसळला. या दुर्घटनेत २जण दगावले होते. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी ज्या बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्या बिल्डरला 2019 मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती
भानूशाली इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू; 4 जखमी
*मुंबई - सीएसटी येथील धोकादायक असलेली भानूशाली इमारत खाली न केल्याने अखेर तडे जाऊन इमारतीचा काही भाग कोसळला होता. 17 जुलै 2020 ला घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते.
*मुंबई - 15 जुलै 2020 ला मुंबईतील ग्रँटरोड पूर्व परिसरात इमारतीचा भाग कोसळला होता. शहापूर बाग जलभाई लेन येथील इडेनवाला ही इमारत जुनी असल्यामुळे या इमारतीचा काही भाग कोसळला होता. यात 2 जण जखमी झाले होते.
*बुलडाणा - जिल्ह्यातील नांदुरा शहरातील गांधी चौकातील आशिष नवगजे यांच्या मालकीची ३ मजली इमारत आज शनिवारी ४ जुलैला सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान अचानक पत्यासारखी कोसळली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. ही इमारत ३४ वर्ष जुनी होती.