मुंबई - "लाव रे तो व्हिडिओ" म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर रान उठवले आहे. सातत्याने ठाकरे हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करत आहेत. आज मुंबईत मोदी यांची सभा होणार असून या सभेत मोदी राज ठाकरे यांना काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. येत्या २९ एप्रिलला महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या प्रचारार्थ मोदी यांची वांद्रे येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
"लाव रे तो व्हिडिओ"वर पंतप्रधान मोदी काय बोलणार? - modi
येत्या २९ एप्रिलला महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान आहे. या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेच्या प्रचारार्थ मोदी यांची वांद्रे येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वांद्रेलील एमएमआरडीए मैदानावर एकाच मंचावर येणार आहेत. ही सभा म्हणजे राजकीय पक्षांना भीमटोला असेल, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे. या सभेत पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य भाषणासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचेही भाषण होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार मोदी आणि शहा यांना लक्ष केले असल्याने पंतप्रधान मोदी राज यांनी कोणत्या शब्दात उत्तर देतात याचीच सर्वत्र चर्चा आहे. तसेच गेल्या साडे चार वर्षात शिवसेना आणि भाजप सत्तेवर असून या वर्षात शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला होता. शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली होती. आता या सभेत एकमेकांवर कशाप्रकारे स्तुतीसुमने उधळण्यात येतात, याकडेही विरोधकांचे लक्ष आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये गुजराती भाषिक मतदार ही मोठ्या प्रमाणात असल्याने मोदी गुजरातीमधून मतदारांना काय संदेश देतात का? याची ही गुजराती भाषिकांना उत्सुकता आहे.