मुंबई - वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय व पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी लवकरच संकेतस्थळ सुरू केले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे किंवा इतर काही कारणांमुळे लिंक, वेबसाईटमध्ये काही अडथळे निर्माण झाले असतील तर त्याची लिंक आणि संकेतस्थळही पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यात या वैद्यकीय, अभियांत्रिेकी, औषध निर्माणशास्त्र आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख १३ हजार २८४ तर देशभरातून ५ लाख २६ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या उर्वरीत सीईटी परीक्षांच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सर्व अडचणींचाही आढावा घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत, यासाठी शासन कटीबद्ध आहे आणि त्या दृष्टीनेच काम करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्या परीक्षा फी पुढील सत्रासाठी वापरणे किंवा त्यांना फी परत करणे याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीचे निर्णय राज्य शासन घेईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी जिल्हा बदली करायचा असेल त्यांना ती सवलत दिली जाणार असून पहिल्यांदाच तालुकास्तरावरही सीईटीच्या परीक्षांचे आयोजन केले जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.