मुंबई - मुंबई, ठाणे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. आता महाविद्यालय कधी सुरू होतात याचीच सर्वांना प्रतिक्षा आहे. याबाबत बोलताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, महाविद्यालय सुरू करण्याबाबत जी माहिती मागविण्यात आली होती, ती आली आहे. प्रधान सचिव प्रस्ताव तयार करत आहेत. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि दोन दिवसात यावर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
माहिती देताना मंत्री उदय सामंत हेही वाचा -टीआरपी घोटाळा प्रकरण: पार्थो दासगुप्तांचा जामीन अर्ज फेटाळला
जानेवारीच्या शेवट पर्यत राज्यातील महाविद्यालये 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापकांशी संवाद साधला होता. राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे कोविडपासून सरंक्षण व्हावे यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. यामुळे महाविद्यालय सुरू करण्यास सरकार सकारात्मक आहे.
हेही वाचा -भाजपच्या कोणत्याही सदस्यांना फिरवायची ताकद महाविकास आघाडीत नाही - नारायण राणे