मुंबई -समुद्राला भरती असताना मुंबईत मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचल्याचा दावा पालिकेने केला आहे. पाणी साचलेल्या ठिकाणावर पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. पुढील 24 तासात आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी मध्यम व जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर 20.2 तर सांताक्रूझ केंद्रावर 77.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई महापालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रांवर शहर विभागात 35.18, पूर्व उपनगरात 25.85 तर पश्चिम उपनगरात 49.40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. समुद्राला भरती असून 3.39 मीटरच्या लाटा उसळण्याची अंदाज होता. मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचल्याचे पालिकेने म्हटले आहे.