मुंबई Water Crisis In Maharashtra :राज्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस खूपच कमी पडला. राज्यातील धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा असला तरी येत्या दोन महिन्यांमध्ये हा पाणीसाठा खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे विंधन विहिरी, नैसर्गिक स्रोत याच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. तसंच पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. मात्र राज्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (less water storage in dam)
तीनशे टँकर सुरू :सध्या राज्यात वाडी वस्तींवर पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 300 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ऑक्टोबर महिन्यातील ही स्थिती असल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करावे लागणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारनं नियोजन केलं आहे. मात्र यात सोबत राज्यातील धरणातील पाणीसाठा किती आहे याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. तलावातील पाणी नदीमधील पाणी विंधन विहिरी याचाही आढावा राज्य सरकारच्या वतीने घेतला जात आहे. पाण्याचं नियोजन अधिक बळकट करणं आणि पाण्याचे स्त्रोत जपणे यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. ज्याद्वारे राज्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार नाही असंही पाटील म्हणाले.