मुंबई - वडाळा रेल्वे स्थानकालगत पूर्वेकडील बाजूस असलेला वडाळा पादचारी पूल व त्याला जोडण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने बंद करण्यात आला आहे. यामुळे बीपीटी वसाहत आणि कोरबा मिठागर येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रवाशांना एक ते दीड किलोमीटर वळसा मारून स्थानकापर्यंत पोचावे लागत आहे.
पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत नाडकर्णी पार्क जवळील वडाळा स्थानक आणि वडाळा पूर्वेला जोडणाऱ्या बीपीटी क्षेत्रामधील स्टील फूट ओव्हर ब्रिजचे पुनर्बांधकाम करण्यासाठी पादचारी पूल बंद करण्यात आला. सोमवारपासून पूल व स्कायवॉक दोन्ही रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
वडाळा पूर्व भागात मोठी लोकवस्ती या पुलाचा वापर करत असून, मुंबई पोर्ट ट्रस्ट वसाहतीत ४ हजारांहून अधिक कामगार कुटुंबीय वास्तव्य करतात. तसेच या भागात रुग्णालय, शाळा, महाविद्यालय देखील आहे. या सर्वांच्या प्रवासासाठी हे दोन्ही पूल एकमेव मार्ग होते. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन एकाच वेळी दोन्ही पूल बंद करण्याऐवजी टप्याटप्याने काम करणे गरजेचे होते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पूल बंद झाल्याने प्रवाशांना एक ते दीड किलोमीटरचा वळसा मारून स्थानक गाठावे लागत आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे प्रवाशांसाठी किमान पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. आमच्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे वसाहत ते शिवडी पूर्व आणि वडाळा स्थानकापर्यंत बस सोडण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.