मुंबई- जुलै २०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुंबई-पुणे हायपरलूपला पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून सरकारने मान्यता दिली होती. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत फेरविचार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प स्थगित होण्याची चिन्हे दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हर्जिन कंपनीचे सर्वेसर्वा ब्रिटीश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सहपरिवार शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गैरसमज दूर करण्यासाठी आणि १० अब्ज डॉलर्स असलेला मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाबद्दल नवं सरकार कसं पाऊल उचणार आहे हे जाणून घेण्यासाठी भेट घेतली आहे.
या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च खासगी क्षेत्राकडून करण्यात येणार असून राज्यातील कोणत्याही निधीवर हा प्रकल्प अवलंबून नसल्याचे ब्रॅन्सन यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांच्यासमवेत या प्रकल्पाबद्दल शंका दूर करण्यासाठी ही भेट असल्याचे ब्रॅन्सन यांनी पत्रकारांना सांगितले. या भेटीदरम्यान या प्रकल्पाची माहिती देणार आहेत. तसेच या प्रकल्पाबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांचीही उत्तरं आपल्यापरिने देऊन हा प्रकल्प स्थगित होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.