मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राच्या अभियांत्रिकी शाखेच्या विविध परीक्षा सुरू असून, प्रथम वर्ष सत्र २ व द्वितीय वर्ष संगणक शाखा सत्र ४ च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाजमाध्यमावर व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत वेळापत्रके विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून समाज माध्यमावर अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II- Choice base ) व द्वितीय वर्ष संगणक शाखा (चॉईस बेस) सत्र 4 (SE Computer Branch Sem IV- Choice base ) च्या परीक्षेची बनावट वेळापत्रके समाज माध्यमावर फिरत आहेत, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. तसेच महाविद्यालये विद्यापीठाकडे याबाबत विचारणा करत आहेत.
विद्यापीठाने दिनांक 14 मार्च 2019 रोजी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्ष (चॉईस बेस) सत्र 2 (FE Sem II- Choice base) या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकले होते. त्यानुसार यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ही परीक्षा 9 मे रोजी सुरु झाली असून ती 7 जूनपर्यंत असणार आहे. आतापर्यंत 3 पेपर झाले असून उर्वरित 3 पेपर 27 मे, 31 मे आणि 7 जून रोजी होणार आहेत.