महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? विनोद तावडेंचा राज ठाकरेंना सवाल - MNS

देश म्हणजे काय मनसे आहे का? खड्ड्यात घालायला, तो १२५ कोटी लोकांचा देश आहे. ही कुठली भाषा आहे? एक तर स्वतःच इंजिन बंद पडले आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

शिक्षण मंत्री विनोद तावडे

By

Published : Apr 7, 2019, 1:18 PM IST

Updated : Apr 7, 2019, 4:11 PM IST

मुंबई- राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? हे विचारा आधी, असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारला आहे. 'देश राहुल गांधीकडे द्या, तो खड्ड्यात तरी घालेल नाहीतर चालवेल तरी, असे आवाहनात्मक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मतदारांना केले होते. त्यावर, प्रत्युत्तर देत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिक्षण मंत्री विनोद तावडे

देश म्हणजे काय मनसे आहे का? खड्ड्यात घालायला, तो १२५ कोटी लोकांचा देश आहे. ही कुठली भाषा आहे? एक तर स्वतःच इंजिन बंद पडले आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. शनिवारी शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढी पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर आज तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जे संजय निरुपम राज ठाकरे यांना 'लुख्खा' म्हणाले. तेच राज ठाकरे आता मनसेच्या कार्यकर्त्यांना निरुपम यांना मतदान करा असे सांगणार, हा मनसे कार्यकर्त्यांवर अन्याय आहे. हा काही खेळ नाही, हा भारत देशाचा प्रश्न आहे. बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांना हा नको म्हणून त्याला निवडून द्या, असे म्हणणे बरोबर नाही. एवढा अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता, आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती. असा खरपूस समाचार तावडे यांनी घेतला आहे.

भाजपकडून पैसे घ्या, पण भाजपला मतदान करु नका असे आवाहन राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये केले होते. या विषयावरुनही तावडे यांनी राज यांचा समाचार घेतला. मराठी माणसाला अशी भाषा आवडत नाही पवारही आधी असे बोलले होते. असे तावडे म्हणाले. मनसेच्या सभेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख राज यांनी आपल्या भाषणात केला नाही. यावर मला वाटत नाही याला काही राजकीय संदर्भ आहेत, जशी स्क्रिप्ट आली तसे ते बोलले, असे विनोद तावडे म्हणाले.

Last Updated : Apr 7, 2019, 4:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details