मुंबई- गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, ते नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? विनोद तावडेंचा सवाल - मुंबई
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान अतिशय धक्कादायक असून, ते नक्षल्यांची भाषा का बोलत आहेत? असा सवाल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना तावडे म्हणाले, की गडचिरोलीतील हा हल्ला निषेधार्हच आहे. त्याचा करावा तितका निषेध कमी आहे. मात्र, लगेच शरद पवार गृहखाते, मुख्यमंत्री, जनाची नाही तर मनाची, अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करत आहेत. जनाची नाही तर मनाची हे वाक्य पवारांच्या तोंडी तरी शोभते काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबई १२ मार्च १९९३ ला बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी हादरली होती. त्यावेळी विधिमंडळात शरद पवारांचा राजीनामा मागण्यात आला होता. छत्तीसगडमध्ये अलिकडेच एक नक्षलवादी हल्ला झाला. त्यामध्ये भाजपचे आमदार या हल्ल्यात मारले गेले. त्यावेळी हे पवार गप्प का होते? केवळ छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते म्हणून? काँग्रेसने देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे जे आश्वासन दिले आहे. त्या निर्णयाला आपण यासाठीच समर्थन दिले का? असा सवालही तावडेंनी उपस्थित केला.