मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेले मृत्यू सरकारच्या निष्क्रीयतेचे बळी आहेत. धरण नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतरही सरकारने कारवाई केली नाही. त्यामुळे या घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारवर ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करावा. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच हे धरण बांधलेल्या स्थानिक सदानंद चव्हाण यांच्या कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. गांधीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तिवरे धरण बांधून फक्त १९ वर्षे झाली. धरणाचे आयुष्यमान साधारणपणे १०० वर्ष असताना अवघ्या १९ वर्षातच धरण फुटले कसे? असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. धरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या धरणाचे काम स्थानिक आमदार सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कंपनीने केले आहे. त्यामुळे दुर्घटनेला ही कंपनी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.