मुंबई- मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खासगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, तसेच पूरग्रस्त भागात आरोग्य पथके तैनात करावीत, अशा मागण्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यातील पूरस्थितीवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर, परिसर तसेच ठाणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, कोकणासह नगर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला आहे. या भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठावरील घरे, वाहने, दुकानातील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शहरातील गृहसंकुलातही पाणी शिरून नुकसान झाले आहे. या पुरामुळे खरिप हंगावर पाणी फेरले आहे. कापूस, मका, तूर, तांदूळ, ऊस, भूईमूग, घेवडा, सोयाबीन या शेतमालाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे हजारो हेक्टरवरची पीके पिवळी पडू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खरिपासाठी कर्ज काढून बी-बियाणे, खताची खरेदी केलेली पण मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.