मुंबई- भाजप-शिवसेना सरकारने 5 वर्षात काहीही काम केले नाही. त्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी वक्तव्य केले.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणूक प्रचारात वारेमाप आश्वासने दिल्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून सत्ता दिली. परंतु, 5 वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागले. त्याचाच परिणाम म्हणून 5 वर्षात तब्बल 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीचा गवगवा केला, पण आजही 30 लाख शेतकरी लाभापासून वंचित असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
पीकविमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची लूट
पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करुन मालामाल झाल्या, पण सरकारने त्यांच्यावर कारवाई केली नाही. पिकाला हमी भाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन फक्त आश्वासनच राहिले. खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वाटप 25 टक्केही झाले नाही. सरकारी बँकांच्या उदासिन धोरणामुळे 75 टक्के शेतकरी वंचित राहिले आहेत. 2016 च्या कर्जाचे पुनर्गठन करुनही बँका त्या कर्जावर 14 ते 16 टक्के व्याज आकारून शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचा आरोप यावेळी वडेट्टीवार यांनी केला.
सरकारने तरुणांची फसवणूक केली -
राज्यातील तरुणांचीही या सरकारने घोर फसवणूक केली आहे. 'मेक इन महाराष्ट्र', 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' या दोन्ही संकल्पना गुंतवणूक व रोजगार निर्मितीमध्ये सपशेल अपयशी ठरल्या आहेत. या गुंतवणुकीतून 36 लाख रोजगार निर्माण होतील हा सरकारचा दावा खोटाच निघाला. 72 हजार जागांसाठीची मेगा भरती, 24 हजार शिक्षक भरतीच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात एकालाही नोकरी मिळालेली नाही. मुद्रा योजनेतून लाखो रोजगार निर्माण झाल्याचा सरकारचा दावाही फसवाच निघाला आहे. नोकरीची आशा लावून बसलेल्या बेरोजगारांच्या स्वप्नांची राखरांगोळी सरकारने केली, त्याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा, असे वडेट्टीवार म्हणाले.