मुंबई- अजित पवार यांनी अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवार) होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाला यशस्वीपणाने सामोरे जावू शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अजित पवारांना राजीनामा द्यायला सांगून भाजपची पत वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पुरेसे संख्याबळ नसताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आहेत, त्यांच्या या पदाचा फडणवीस यांनी स्थापन केलेले सरकार वाचवण्यासाठी तांत्रिक फायदा होईल असा व्होरा भाजपमधील धुरीणांना होता, मात्र तो सपशेल फोल ठरला.
महाराष्ट्राचा निकाल जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला. मात्र, प्रगत राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुटलेला नाही. रोज नवे डावपेच आणि खेळ सुरू आहेत. महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, असे वाटत होते. तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेत 'मी पुन्हा येईन' हे वक्तव्य खरे करून दाखवले होते. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बेकायदेशीररित्या हा निर्णय राज्यपालांनी घेतला असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
तेव्हा आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला, त्यात न्यायालयाने भाजपला उद्या (27 नोव्हेंबर) ला 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.