महाराष्ट्र

maharashtra

पूरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठ करणार २५ लाखांची मदत - कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर

By

Published : Aug 15, 2019, 12:25 PM IST

मुंबई विद्यापीठ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २५ लाखांचे आर्थिक सहाय्य करणार आहे. त्याचबरोबर या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे.

मुंबई विद्यापीठ

मुंबई -राज्यातील कोल्हापूर, सांगली कोकण येथे उद्भवलेल्या भीषण पूरस्थितीमुळे झालेले नुकसान आणि जनजीवन पूर्ववत होण्यासाठी होत असलेली मदत. यातच आता, पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 लाखांचे आर्थिक सहाय्य करणार आहे. त्याचबरोबर या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी सामाजिक सलोखा आणि बांधिलकी जपत विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रुपये 25 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर या पूरपरिस्थितीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाने या भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वह्या, पेन, प्रयोगशाळा साहित्य आदी बाबी उपलब्ध करुन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे.

यासाठी विद्यापीठाने एका अभ्यासगटाची निर्मिती केली असून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत, प्रा. रविकांत सांगुर्डे, डॉ. सुनिल पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. सुधीर पुराणिक, राष्ट्रीय सेवा योजना संचालक, क्रीडा व शारिरीक शिक्षण संचालक डॉ. मोहन अमरुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभ्यासगटाने प्रत्यक्ष ठिकाणी भेटी देऊन व परिस्थितीचा अभ्यास करुन आवश्यक त्या ठिकाणी कोणत्या शैक्षणिक साहित्यांची गरज आहे याचीही पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांना देखील विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षामध्ये आवश्यक शैक्षणिक साहित्य जमा करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येणार असून त्यानुसार विद्यापीठाच्या केंद्रीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details