मुंबई- कोरोना हा विषाणू चीनमधून आलेला असून तो चिकन किंवा अंड्यातून पसरत नाही. चिकन व अंड्यामध्ये जीवनसत्त्व व प्रोटीन असतात. त्यामुळे हे पौष्टीक पदार्थ आहेत, असे पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश भोसले म्हणाले.
'चिकन अन् अंडी हे तर पौष्टीक पदार्थ.. बिनधास्त खा, अफवांवर विश्वास ठेऊ नका!' - अफवा
चीनमधून कोरोना विषाणूने भारतात प्रवेश केला आहे. दरम्यान, काहींनी समाज माध्यमांवरुन चिकन किंवा अंडी खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरवली. यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पण, अफवांवर विश्वास न ठेवता चिकन व अंडी खावा, असे आवाहन पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश भोसले केले.
ते म्हणाले काही लोक समाज माध्यमांवरून अफवा पसरवत आहेत की चिकन किंवा अंड्यांमुळे कोरोना होतो. हा निव्वळ चुकीचा संदेश आहे. या अफवांमुळे पोल्ट्री, कुक्कुटपालन करणारे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे काहींवर उपासमारीची वेळ येत आहे. पोल्टी व्यवसायिकांकडून किंवा शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कोंबड्या खरेदी केल्या जात आहेत. पण, किरकोळ व्यापारी त्यानुसार भाव कमी न करता केवळ काही रूपयांच्या फरकाने बाजारात विकले जात आहे. त्यामुळे ग्राहक व ठोक व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून चिकन किंवा अंड्यांमुळे कोरोना होतो, असा संदेश परवू नका. उलट हे पौष्टीक पदार्थ असल्याने ते बिनधास्तपणे खावा, असेही डॉ. भोसले म्हणाले.