मुंबई - गणेशोत्सव म्हटला की मुंबईकरांच्या डोळ्यासमोर येतो तो लालबाग मार्केट. मात्र, सध्या कोरोनामुळे उत्सवाच्या खरेदीवर मंदीचे सावट आहे. यावर लालबाग येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत एक ऑनलाईन वेबसाइट सुरू करत त्यांनी गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य लोकांना घरपोच मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. यामुळे आता भाविकांना घरबसल्या साहित्य घेणे सोपे जाणार आहे.
घरगुती गणेशोत्सवासाच्या खरेदीसाठी हक्काची बाजारपेठ म्हणून लालबाग मार्केटला नागरिकांची पंसती असते. गणेशोत्सव, गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे उत्सवाच्या खरेदीवर मंदीचे सावट घोंगावत आहे. त्यामुळे लालबाग येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येत साहित्य विक्रीसाठी श्रद्धा आर्टस् नावाची ऑनलाईन वेबसाइट सुरु केली आहे. लोकांना घरच्या पुजेचे साहित्य मिळावे हा या वेबसाईटचा हेतू आहे. लालबाग मार्केटमध्ये गौरींच्या मुखवट्यांपासून साडी, दागिने आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. मात्र यावर्षी गर्दी टाळता यावी, नियमांचे पालन व्हावे, यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. गौरींचे मुखवटे, इतर साहित्य आणि पूर्ण गौरींची मूर्ती ऑनलाइन विक्री होणार आहेत. गौरींच्या मूर्ती आणि साहित्यांची विक्री अशाप्रकारे करण्याचा हा जवळपास पहिलाच प्रयोग असल्याचा दावा या निमित्ताने केला जात आहे.