मुंबई- कोरोना महामारीच्या विळख्यात सगळेच अडकले आहेत. सर्वत्र कोरोना विषाणुचा संसर्ग पसरला आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने ह्या संसर्गाशी लढत आहे. दुसरीकडे ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता, सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे, असे ठाम मत अनाथ मुलांना शिक्षण देणाऱ्या वात्सल्य फाउंडेशनच्या स्वाती मुखर्जी यांनी 'ईटीव्ही भारत'कडे मांडले. येथील अनाथ मुलांच्या संगोपनाबरोबरच ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देत असल्याचे त्या म्हणाल्या.
पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज, वात्सल्य फाउंडेशनचे आवाहन
ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. सध्याची बिकट परिस्थिती पाहता, सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे, असे ठाम मत अनाथ मुलांना शिक्षण देणाऱ्या वात्सल्य फाउंडेशनच्या स्वाती मुखर्जी यांनी 'ईटीव्ही भारत'कडे मांडले. येथील अनाथ मुलांच्या संगोपनाबरोबरच ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देत असल्याचे त्या म्हणाल्या.
राज्यात मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मार्चपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. अनेकांना ऑक्सिजनदेखील मिळत नसल्याची स्थिती आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीमुळे नैसर्गिक ऑक्सिजन मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. एकीकडे वृक्षतोड होत असली तरी दुसरीकडे महालक्ष्मी येथील वात्सल्य फाउंडेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. झाडांमुळे येथे ऑक्सिजनची मात्रा राखण्यास मदत होत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये पर्यावरणाबाबत मानसिक बदल घडवणे गरजेचे आहे. निसर्ग मानवाला खूप देत असतो, त्यांचे उत्तरदायित्व म्हणून आपले पर्यावरण समृद्ध ठेवणे व त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सध्याची परिस्थिती बिकट असून सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करावे, असे आवाहन वात्सल्य फाउंडेशनच्या स्वाती मुखर्जी यांनी करताना तसेच नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर राखावे, असा सल्ला दिला आहे.
ऑनलाइन शिक्षणावर भर
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्यासाठी डिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब वाढला आहे. अनाथ मुलांना शिक्षण देणाऱ्या वात्सल्य फाउंडेशनने देखील ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना देण्यावर भर दिला आहे. १९८२ पासून ही संस्था अनाथ मुलांना शिक्षण देत आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी येथे घडले आहेत. मराठी आणि हिंदी अशा दोन माध्यमांत एकूण ४७ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. टाळेबंदी लागल्यापासून येथील विद्यार्थ्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय येथे केली आहे. विशेष कर्मचारी वर्ग यासाठी कार्यरत आहेत. शासनाकडून आर्थिक निधी मिळतो. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे यावेळी विलंब झाला आहे. आर्थिक नियोजनाचा ताळमेळ घालणे यामुळे जिकिरीचे होत आहे. अशा स्थितीही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि संगोपनाचे काम अनियमितपणे सुरू आहे, असे स्वाती मुखर्जी यांनी सांगितले.
भविष्यात दुसऱ्याला मदत करेन
माहीम नयानगर झोपडपट्टी येथे राहायचो. सन २००६ ला वात्सल्य फाउंडेशनमध्ये मित्रांच्या संगतीने संस्थेत दाखल झालो. संपूर्ण शिक्षण इथेच झाले असून आता 'मास्टर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'मधून खालसा महाविद्यालयात आयटीचे शिक्षण घेत आहे. पदवी पूर्ण करून आयटी कंपनीत जॉब मिळावा, अशी इच्छा आहे. भविष्यात दुसऱ्यांना मदत करणार, असे अनिल भीमराव धोंडेल या विद्यार्थ्याने सांगितले.