मुंबई - शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यामुळे ई-लर्निंग, इंटरनेट कनेक्टिव्हिटीला अडचण आहे अशा आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमांचा लाभ घेता येईल.
शैक्षणिक कार्यक्रमाकरिता दूरदर्शन आणि रेडिओचे स्लॉट द्या, शिक्षणमंत्र्यांची मागणी - demand of slot on dd and radio
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे शाळा बंद आहेत. कोरोनाचा सध्याचा प्रसार लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर येत आहे. मात्र, ग्रामीण भाग आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. यावर उपाय म्हणून शैक्षणिक कार्यक्रम आयोजनाकरिता दूरदर्शनवर 12 तास, रेडिओसाठी 2 तासांचा स्लॉट उपलब्ध करून द्यावा, यासाठी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला एक पत्र लिहिले आहे. “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) महाराष्ट्रात यापूर्वीच एक हजार तासांचे डिजिटल शिक्षणसाहित्य संकलित झाले आहे. प्राथमिक ते माध्यमिक वर्ग संवादात्मक सामग्री पण सरकारकडे आहे. आगामी शैक्षणिक वर्षाच्या दरम्यान, दूरदर्शन (डीडी) चॅनेल अंतर्गत येणाऱ्या दोन वाहिन्यांद्वारे 12 तासांच्या दैनंदिन सामग्रीचे आणि ऑल इंडिया रेडिओवर (एआयआर) 2 तास शैक्षणिक सामग्री प्रसारित करण्याची आमची इच्छा आहे. ”, असा या पत्रात नमूद करण्या आले आहे.
शासनाकडील अद्ययावत आकडेवारीनुसार ग्रामीण व आदिवासी पट्ट्यांमधील 84 हजार 590 शाळांसह महाराष्ट्रात 1.13 लाख शाळा आहेत. राज्यतील एकूण 2.5 कोटी विद्यार्थ्यांपैकी 1.18 कोटी विद्यार्थी ग्रामीण आणि आदिवासी शाळांमध्ये दाखल आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.