मुंबईVaravara Rao Eye Surgery:भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते वरावरा राव यांना राष्ट्रीय तपास संस्थेने आरोप ठेवून 2018 साली अटक केलेली होती. एकूण 16 आरोपींमध्ये वरावरा राव हे देखील आरोपी आहेत आणि भीमा कोरेगाव पुण्यामधील दंगलीला हेसुद्धा जबाबदार असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेचं म्हणणं आहे. त्या संदर्भात सुनावणी उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे; परंतु वरवरा राव यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने त्यांना वैद्यकीय कारणाच्या आधारे त्यांचे वाढते वय लक्षात घेता उच्च न्यायालयाने जामीन दिलेला होता.
'एनआयए'चा विरोध:वाढते वय असल्यामुळे आणि डोळ्यांना कमी दिसणं तसेच डोळ्यांच्या विविध तक्रारी वरावरा राव यांच्या येऊ लागल्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्ज केला होता. न्यायालयामध्ये ज्येष्ठ वकील पी सत्यनारायण यांनी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दहा दिवस सुट्टी मिळावी यासाठी न्यायालयाने परवानगी द्यावी असा मुद्दा मांडला. त्यावेळेला राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) याला जोरदार विरोध केला.
रुग्णालयाविषयी दिली माहिती:ज्येष्ठ वकील पी सत्यनारायण यांनी "सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा ट्रायल कोर्टाच्या आणि उच्च न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे पालन करीत कोणत्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया होणार आहे, याविषयी सांगितले. तसेच तेथे ती अत्यंत कमी खर्चात होणार आहे. या सर्व बाबी आम्ही अर्जामध्ये नमूद केलेल्या आहेत. बाहेर हा खर्च दोन लाखाच्या पुढे जाणार; परंतु सार्वजनिक या ट्रस्टी रुग्णालयामध्ये दीड लाखाच्या आतमध्ये शस्त्रक्रियेचा खर्च होऊ शकेल, अशी माहिती दिली.
'एनआयए'ची सुरक्षेच्या मुद्द्यावरून हरकत:राष्ट्रीय तपास संस्थेकडून सुनावणी दरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की, वरावरा राव यांच्या सुरक्षेचे काय? त्यावर न्यायालयाने सांगितले की, सुरक्षा नियमानुसार असेल ती सुविधा दिली जाईल. काही अटी आणि शर्तीच्या आधारे त्यांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिल्यास तुमची हरकत आहे का? त्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने हरकत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.