मुंबई- सुधारित नागरिकत्व कायदा आणि नवरत्न कंपन्या विकण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज (शुक्रवार) बंद पुकारला आहे. या बंदचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी जाणवू लागला आहे. वंचितची ताकद असलेल्या विक्रोळी, मुलुंड, वरळी, चेंबूर याठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत.
उपनगरात काही ठिकाणी दुकानं बंद करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त ठेवला आहे. चेंबूर परिसरात एका बसवर दगडफेक देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आता सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दगडफेक करणारे हे वंचितचे कार्यकर्ते नाहीत. पोलिसांनी त्याची चौकशी करावी, अशी मागणी आंबेडकर यांनीं केली आहे.