मुंबई: गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालय राज्यातील सत्ता संघर्ष बाबतचा निर्णय देणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे राज्यासह देशातील अनेक राजकीय नेत्यांसह घटना तज्ञांचा देखील लक्ष असणार आहे. राज्यातील शिंदे सरकार जर कोसळले तर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ता संघर्षाचा निर्णय काय लागेल:निकाल काही जरी लागला तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. उद्धव ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे जनता देखील आमच्या सोबत आहे. असे उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. वैभव नाईक यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट यांनी म्हटल्याप्रमाणे अनेकवेळा सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आल्या होत्या. जनतेबरोबर ठाम राहिलो. सत्ता संघर्षाचा निर्णय काय लागेल याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे. याआधी देखील निवडणूक आयोगाने लाखो शपथपत्र घेऊनसुद्धा निवडणूक आयोगाने कोणत्या दबावाखाली निर्णय दिला हे राज्यातील जनतेला माहित आहे, असे वैभव नाईक म्हणाले.
निवडणुकीला सामोरे जा:तसेचवैभव नाईक यांनी सांगितल की, सत्तेतील अनेक लोक आम्हाला आमच्यासोबत येण्यास सांगत होते. त्यांनी हे देखील सांगितले होते की, निवडणूक आयोग आणि उद्याचा येणारा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार. आमच्याच बाजूने निर्णय येणार असे देखील ते म्हणत होते. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संजय शिरसाट यांना उद्याच्या निर्णयाची काळजी करावी लागणार आहे. आमच्यासोबत जनता आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही. हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा आम्ही निवडणुकीला तयार आहोत अशा प्रकारचे आव्हान ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.
गरज पडल्यास राज्यपालांची भेट घेऊ: लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. उद्याचा निकाल महाविकास आघाडीच्या म्हणजेच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागेल. 16 लोकांनी सरकार बनवण्यासाठी कायदा भंग पद्धतीने काम केले. 16 अपात्र होतील सरकार कोसळेल. अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. सरकार जर कोसळले तर महाविकास आघाडीतील काँग्रेसमधून आमची भूमिका ही स्पष्ट असणार आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असणार आहोत. राज्यातील निवडणूक लांबनीवर टाकून राष्ट्रपती राजवट लावण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. गरज पडल्यास आम्ही राज्यपालांची देखील भेट घेऊ आणि एक दिलाने महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेसप्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.