मुंबई- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण १२ मेपासून बंद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही मुंबईत गेल्या १४ दिवसांत १८ ते ४४ वयोगटातील तब्बल ७२ हजार ४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने आणि मुंबई महापालिकेने या वयोगटाचे लसीकरण बंद केल्याची घोषणा केली असली तरी मुंबईत मात्र या वयोगटातील लसीकरण जोरात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. हा प्रसार या वर्षी जानेवारी फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात कमी झाला. याच दरम्यान १६ जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जात होती. १ मार्चपासून ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ ते ५९ वर्षामधील नागरिकांना लस सिली जात आहे. तर १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीचा तुटवडा भासू लागल्याने तसेच लाखो नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्याने १२ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यानुसार मुंबई महापालिकेनेही या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
१४ दिवसात ७२ हजार ४८६ नागरिकांचे लसीकरण
१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. १२ मे रोजी लसीकरण बंद करण्याची घोषणा करण्यात आली. त्यावेळी ३९ हजार २९ नागरिकांना लस देण्यात आली होती. लसीकरण बंद असले तरी २६ मेपर्यंत याच वयोगटातील १ लाख ११ हजार ५१५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. १२ मे ते २६ मे या १४ दिवसांच्या कालावधीत तब्बल ७२ हजार ४८६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याचाच अर्थ एकीकडे लसीकरण बंद आहे असे सांगितले जात असले तरी या वयोगटाला लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला मिटिंगमध्ये सर्व अधिकारी व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही.