पेण(रायगड) : महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी गती देणारा मुंबई-गोवा महामार्ग या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. गडकरी पनवेल येथील खारपाडा टोल प्लाझाजवळील खारपाडा गावात बोलत होते. त्यामुळे ही कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे.
महामार्गाचे भूमीपूजन : राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 मुंबई ते गोवा महामार्ग पनवेल ते कासू महामार्गाची लांबी 42.300 किमी आहे. तसेच या महामार्गाला 251.96 कोटी खर्च येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 DD राजेवाडी फाटा ते वरंधा गाव या रसत्याची लांबी 13 किमी असुन खर्च 126.73 कोटी असणार आहे. दोन- राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 DD भूमिपूजन सपाटीकरण कार्यक्रम याद्वारे वरंध गाव ते पुणे जिल्ह्याच्या सीमेपर्यंत तीन प्रकल्पांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची लांबी 8.60 किमी असुन खर्च 35.99 कोटी असणार आहे. एकूण महामार्गाची लांबी 63.900 किमी असणार आहे. यासाठी एकूण 414.68 कोटी खर्च येणार आहे.
मोरबे-करंजाडे रसत्याची घोषणा : भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदार अशा समस्यांमुळे कोकणातील अनेक कामगारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी 13 हजार कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या कामाची घोषणा केली. हा मार्ग जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल. ज्यामुळे मुंबई ते दिल्ली प्रवासाचा वेळ कमी होईल. 1200 कोटी रुपयांचे कळंबोली जंक्शन तसेच 1146 कोटी रुपयांचे पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.