मुंबई:निर्मला सितारामन म्हणाल्या की, मोदी सरकारला ९ वर्षे झाली असली तरीसुद्धा ही प्रगती फक्त ६ वर्षांमध्ये झालेली आहे. त्यांनी जनतेला काही वचन दिले होते. त्याची पूर्तता मोदी सरकारने केलेली आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्रातील योजना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच त्यांची काम करण्याची पद्धत जनतेला फार आवडत आहे. २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर वित्तमंत्र्यांनी सांगितले आहे की, हा 'आरबीआय'चा निर्णय आहे. 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
कॉंग्रेसवर निशाना:प्रत्येक निवडणूक ही पक्षासाठी महत्त्वाची असते. जनतेच्या हिताचे प्रश्न लक्षात घेऊन त्या पद्धतीने पक्ष आपली रणनीती बनवत असतात. परंतु, या सर्व बाबतीत मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस फक्त बोलत आहे. ते कुठल्याही गोष्टी वास्तविकतेमध्ये आणत नाहीत. प्रश्न उपस्थित करणे हे विरोधकांचे काम आहे. परंतु, काँग्रेसने त्यांच्या पक्षावर लक्ष देणे जास्त गरजेचे असल्याचेही निर्मला सितारामन यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी?शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट केले जाणार, असे वचन मोदी सरकारने दिले होते. यावर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या की, शेतकऱ्यांचे उत्पन्न रातोरात दुप्पट होणार नाही. शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. मध्यंतरी शेतकऱ्यांना हवे ते भेटले नाही; पण विविध पद्धतीने सरकार त्यांना मदत करत आहे. संपूर्ण जगात मध उत्पादनात आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. दूध उत्पादन, केळी उत्पादन, गहू उत्पादन, भात उत्पादन या सर्वांमध्येसुद्धा आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नसले तरीसुद्धा त्यांच्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहेत. शेतकऱ्यांच्या विजेचा खर्चसुद्धा कमी झालेला आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही निर्मला सितारामन यांनी सांगितले.