युनिसेफचे आरोग्य तज्ञ डॉ आशिष चौहान यांची माहिती देताना मुंबई : मुंबईमध्ये गेल्या तीन वर्षापेक्षा यंदा गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रसार वाढला आहे. लसीकरण न होणे, जनजागृती कमी होणे यामुळे हा प्रसार वाढल्याचे समोर आले आहे. गोवरचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने लसीकरण मोहीम सुरु केली आहे. मात्र त्यानंतरही ९ महिने ते ५ वर्षांमधील २० टक्के तर ६ महिन्यावरील बालकांचे २८ टक्के लसीकरण करण्यास पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे.
बालकांना वेल्वार लस द्या : कोरोनाचा प्रसार झाल्याने बालकांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाले आहे. बालकांना पौष्टीक आहार न मिळणे, लसीकरणाची भीती या कारणामुळे भारतात यामुळे गोवरचा प्रसार झाला. पुढे जाऊन कोणतेही आजार होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपल्या बालकांना वेळेवर लस द्यावी, असे आवाहन युनिसेफचे आरोग्य तज्ञ डॉ. आशिष चौहान ( UNICEF health expert Dr Ashish Chauhan ) व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशनच्या डॉ. मीता यांनी केले आहे.
गोवरमुळे १७ बालकांचा मृत्यू : मुंबईमध्ये गोवरचे ( Measles Patients ) २०२० मध्ये २५ रुग्ण आढळून आले, २०२१ मध्ये ९ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये गोवर आजारांच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत ४९० निश्चित निदान झालेले रुग्ण आढळून आले असून १७ बालकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ताप आणि पुरळ असलेले ५१०३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण १७ पैकी १४ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १४ मृत्यूपैकी ९ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ५ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
यामुळे गोवर पसरला : मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान गोवरचे लसीकरण योग्य प्रमाणात झालेले नाही. गोवरची लस घेतल्यास इतर काही आजार होतील अशी भीती मुस्लिम धर्मीयांमध्ये होती. पालिकेचे आरोग्य विभागही गोवर लसीबाबत जनजागृती करण्यास कमी पडली. या सर्व कारणाने मुंबईत गोवर पसरला. गोवरचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने शोध मोहीम सुरु केली. जी मुले लसीपासून वंचित राहिली आहेत त्यांना शोधून त्यांचे लसीकरण केले जात आहे. तसेच केंद्र सरकारच्या आदेशाने ६ महिने ते ९ महिन्याच्या बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
२० टक्के लसीकरण : गोवरचा प्रसार रोखण्यासाठी २१ हजार ५७१ बालकांचे नियमित लसीकरण करण्यात आले आहे. अतिरिक्त सत्रात २६ हजार ५५५ मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. १५ डिसेंबर पासून विशेष लसीकरण सत्र सुरू आहे. त्यात १३०१ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ५७ हजार ५२५ मुलांपैकी ५५,२२७ म्हणजे २०.४५ टक्के बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत ज्या विभागात रुग्णसंख्या १० टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील ६ ते ९ महिन्यातील ५२९३ बालकांपैकी १४९० म्हणजे २८.१२ टक्के बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.
या उपाययोजना : गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.