Mahim Dargah Encroached Demolition मुंबई : माहीम दर्ग्याजवळ एका मुस्लिम मजारीच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामावरती तातडीने कारवाई करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यावर त्याला त्या ठिकाणी दफन केले जाते. त्याला, मजार असं बोललं जाते. मात्र, ज्या ठिकाणी कारवाई झाली ते ठिकाण मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असे स्थळ होते अशी माहिती मुस्लिम धर्मीय नागरिकांकडून देण्यात आली आहे.
मजार म्हणजे काय : प्रत्येक धर्माच्या लोकांमध्ये विशिष्ट असे प्रकार असतात. हिंदू धर्मियांमध्ये नागरिकांना मृत्यूनंतर स्मशानात जाळले जाते. लहान मुले असल्यास त्यांना मातीमध्ये दफन केले जाते. मुस्लिम धर्मियांमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीला कब्रस्तानमध्ये दफन केले जाते. ज्या मृत व्यक्तीला कब्रस्तानामध्ये दफन केले जाते त्या जागेवरती संबंधितांच्या व्यक्तीच्या नातेवाईक आणि कुटुंबियांकडून चादर चढवली जाते. त्या ठिकाणी नातेवाईक त्या मृत व्यक्तीच्या नावे दुवा मागतात त्याला मजार असे बोलले जाते, अशी माहिती मुस्लिम धर्म गुरू मुफ्ती मंजर यांनी दिली आहे.
अनधिकृत बांधकामावर कारवाई : काल गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये माहीम समुद्रामध्ये माहीम दर्ग्याच्या बाजुला अनधिकृत बांधकाम होत असल्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर तातडीने मेरीटाईम बोर्ड, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणा यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन मजारच्या बाजूला झालेले अनधिकृत बांधकाम तोडले आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणानंतर १२ तासात कारवाई झाली आहे.
राजकीय टीका : राज ठाकरे यांनी केलेल्या मजारीवाली आरोपाबाबत राजकीय टीका होऊ लागली आहे. त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचली असावी. महाराष्ट्रात इतरही काही गोष्टी आहेत त्याबाबत पत्र दिल्यास लवकर कारवाई होऊ शकते, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तर, राज ठाकरे यांना भाजपानेच क्ल्यू दिला असावा अशी प्रतिक्रिया एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi Convict: दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'सत्य आणि अहिंसा हा माझा धर्म'..