मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आणि महाआरती सुरू केल्यानंतर शिवसेनेला आपले हिंदुत्व असली आहे हे ठासून सांगावे लागत आहे. भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सोबत गेलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाला फाटा दिल्याचा आरोप करीत जनमानसामध्ये शिवसेनेने हिंदुत्वाला सोडल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांनी चालवला आहे. मात्र या दोन पक्षांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि शिवसेना हाच खरा हिंदुत्ववादी पक्ष आहे हे दाखवण्यासाठी शिवसेनेने ही कंबर कसली आहे.
मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये शनिवारी भव्य सभेचे आयोजन केले आहे. मात्र या सभेला संबोधित करताना शिवसेनेने सावध पवित्रा घेतला असून शिवसेना ही केवळ हिंदुत्वाच्या धार्मिक आणि भावनिक मुद्द्यावरच राजकारण करीत नसून विकासाच्या मुद्द्यावरही शिवसेना तितक्याच प्रभावीपणे काम करीत आहे हे दाखवण्यासाठी शिवसेनेने हाताला काम आणि हृदयात राम या थीमलाईनवर आजच्या सभेबाबत प्रचार केला आहे. या संदर्भात शिवसेना आणि भाजपाची काय भूमिका आहे हे आधी जाणून घेऊया.
ह्दयात सत्ता आणि डोक्यात सत्तेची हवा - उपाध्ये :ह्दयात राम आणि हाताला काम देणारे आमचे हिंदुत्व असा हुंकार देणाऱ्या शिवसेनेने आधी उन्हात राणा दाम्पत्यांच्या घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी. एसटी कर्मचाऱ्यांनी ५ महिने संप पुकारला. अनेक कर्मचाऱ्यांचे डोळ्यादेखत आयुष्य संपवले. त्यांच्या हाताचे काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचे नाव घेणेही पाप ठरेल. अशी प्रतिक्रिया भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे.
बॅनरवर हिंदुत्व शब्द लिहिला परंतु चेहऱ्यावर असलेला पुरोगामी बुरखा उतरवला. ‘ह्दयात सत्ता आणि डोक्यात सत्तेची हवा’ असणाऱ्या मुख्यमंत्रिपदासाठी भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी करून हिंदुत्व कधीच सोडलं. आता केवळ उरला आहे तो केवळ दिखावापणा. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात? असेही उपाध्ये म्हणाले.
शिवसेनेला कुणी हिंदुत्व शिकवू नये - कायंदे :शिवसेनेला कुणीही हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. मग ते भाजपा असो अथवा भाजपाच्या बी किंवा सी टीम असोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वासाठी लढा दिला आहे आणि उघडपणे अनेक प्रकरणे अंगावर घेतली आहे. शिवसेना हिंदुत्ववादी होती आणि असणार आहे मात्र त्याच सोबत शिवसेना जनतेच्या विकासालाही विसरत नाही. केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण करणे शिवसेनेला मान्य नाही म्हणूनच गेल्या दोन वर्षांमध्ये आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही सर्वच स्तरावर विकासाच्या नवनवीन संधी निर्माण करत आहोत रोजगार निर्माण करत आहोत आणि शेतकऱ्यांना दिलासा देत आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या आमदार प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच : राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि इतर योजना राबवल्यानंतरही राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2021 मी ते 30 नोव्हेंबर 2021 या 11 महिन्यांत 2 हजार 489 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या. तर 2020 या वर्षात एकूण 2 हजार 547 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या औरंगाबाद आणि नागपूर विभागात झाल्या. गेल्या दोन वर्षांत येथे अनुक्रमे 1 हजार 577 आणि 578 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर कोकण विभागात मागील दोन वर्षांत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. विदर्भातील शेतकरी आत्महत्या या सगळ्यात जास्त असून राज्यातील सरासरी 50 टक्के आत्महत्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या आहेत. यावर्षी अमरावती जिल्ह्यात 331 तर यवतमाळ जिल्ह्यात 270 हून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.
महाराष्ट्रात रोजगार निर्मिती? :राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30 हजारांपेक्षा अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. याबरोबरच मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 189000 हजार कोटी रूपये गुंतवणूक करून रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी निर्माण करण्यात येतील असा दावा शासनाने केला असून गेल्या दोन वर्षांमध्ये 1900 कोटी रुपये परदेशी गुंतवणूक आल्याचा दावा सरकारने केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या सभांचा धुरळा उडणार :राज्यातील राजकीय परिस्थितीवर शिवसेना पक्षप्रमुखांची आज बिकेसी मैदानात सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच, आता महाराष्ट्रभर सभांचा धुरळा उडवून देण्याचे नियोजन शिवसेनेने आखले आहे. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
भाजप कडून शिवसेनेवर टीका : भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजप कडून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष यांनी हिंदुत्वाचा मुद्दला हात घालत शिवसेनेवर सडकून टीका करत आहे. विरोधकांच्या टीकेला शिवसेनेकडून आज प्रत्युत्तर दिले जाणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात सभेचा धुरळा:मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेणार आहेत महाराष्ट्रातील विभागवार सभा घेण्याबाबत नियोजनाचे काम सुरू झाले आहे. लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील. तसेच संपूर्ण सभांच्या कार्यक्रमात पूर्वी शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे समजते.
शिवसैनिकांची उस्तुकता पणाला :विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार आहेत. सभेपूर्वी शिवसेनेकडून आतापर्यंत तीन टिझर प्रदर्शित केले आहेत. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला छेडणाऱ्या विरोधकांना खऱ्या हिंदुत्वाचा ललकार ऐकायला यायलाच हवं असे आवाहन केले आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याबाबत शिवसैनिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसैनिक सभेला येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 'जमलेल्या माझ्या तमाम..', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज मुंबईत सभा.. विरोधकांचा घेणार समाचार