मुंबई- कोरोना संकटात वैद्यकीय विद्यार्थी सेवा बजावत आहेत. यामुळे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने, एमडी आणि एमएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करावा आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला तसे आदेश द्यावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे.
एमसीआयने 18 जून रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असे सांगितलेले आहे. यानुसार महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 15 जुलैपर्यंत या परीक्षा घेण्यात याव्यात असे सांगितले आहे. पण सध्या राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत. याच दरम्यान जर हे प्रशिक्षित डॉक्टर परीक्षेसाठी गेले, तर राज्यात डॉक्टरांचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.