मुंबईUddhav Thackeray News :अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळं देशभरात नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. तर, दुसरीकडं राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र, 'मी' या कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार नाही. नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली.
काळाराम मंदिरात महाआरती :माजी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,राम मंदिरासाठी पंचवीस वर्षे संघर्ष करावा लागला. त्या राम मंदिरात प्रभू रामाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर आनंदाचा दिवस आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंदिराच्या बांधणीच्या मार्ग मोकळा झाला. त्यामुळं संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. आम्ही देखील 22 जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरती करणार आहोत.
काळाराम मंदिराचादेखील इतिहास आहे. या मंदिरात बहुजनांना प्रवेश नव्हता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजींनी आंदोलन केली. त्यानंतर या मंदिरात सर्वसामान्यांना प्रवेश मिळू लागला. त्यामुळं आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती करणार आहोत- शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे