मुंबई :गेल्या आठवड्यात लबाड लवादानं निकाल दिलाय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. राहुल नार्वेकर, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेत यावं. त्यानंतर कोण कोणाला गाडणार ते दाखवू, त्यानंतर खरी शिवसेना कुणाची कळेल, असं ठाकरे यांनी म्हटंलय. एकनाथ शिंदे टाईमपास करायला उच्च न्यायालयात गेले आहेत. निवडणूक आयोगानं मोठा घोटाळा केलाय. त्यांनी आमचे पैसे परत करावे, अशी मागणी ठाकरे यांनी केलीय. ईडी देखील त्यांचीच आहे, आत्ता उघड बोलतोय, असं म्हणत ठाकरेंनी निवडणूक आयोगाला फटकारलं आहे.
महाराष्ट्रातून लोकशाहीचा खून करण्यास सुरवात : तत्कालीन राज्यपाल भगतशिंह कोश्यारी सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होते. त्यामुळं राज्यातलं सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात असंवैधानिक मिंधे सरकार आलं. विरोधक शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस देखील संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचे अध्यक्ष उघड बोलताय. देशात एकच पक्ष राहणार, त्यामुळं लोकशाही टिकणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. महाराष्ट्रातून लोकशाहीचा खून करण्यास सुरवात झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटंलय. देशात घातक पद्धतीनं राजकारण सुरू आहे. मात्र महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देणार नाही, राज्याची माती त्यांना गाडून टाकेल. माझी निवड अमान्य असेल, तर माझी स्वाक्षरी कशी घेतली. शिवसेना हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे, असं देखील ते म्हणाले.
निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करावा : निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करावा. त्यांनी आम्हाला कामाला लावलं होतं. आम्ही दिलेल्या लाखो रुपयांच्या कागदपत्रांचं त्यांनी काय केलं? त्यामुळं आमचे पैसे आम्हाला वापस द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केलीय.