पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे मुंबई Uddhav Thackeray Dharavi : धारावी प्रकल्पाबाबत विविध मागण्यांसाठी शनिवारी (१६ डिसेंबर) ठाकरे गटानं मोर्चा काढला होता. या मोर्चाला काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. धारावी ते बांद्रा असा लाखोंच्या संख्येनं हा मोर्चा काढण्यात आला होता.
पापडासारखं ठेचून टाकू : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अदानी आणि राज्य सरकारला इशारा दिला आहे. "आम्हाला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे. ज्यांनी-ज्यांनी अदानींची सुपारी घेतली, त्यांना ठेचून टाकू. धारावीमध्ये काय मिळत नाही? काय बनत नाही. सर्व बनतंय. धारावीमधील भूमिपुत्राला ३०० चौरस फुटाचं घर न देता, ५५० चौरस फुटाचं घर मिळालंच पाहिजे. तरच तिथली चावी घ्यायची. अन्यथा बाजूला व्हायचं नाही", अशा प्रकारे इशारा देऊन भूमिपुत्रांना आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
आता कळलं ५० खोके कुठून आले :पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "यांना आता खोके कमी पडले म्हणून यांनी धारावीचा घाट घातलाय. 'सरकार आपल्या दारी नाही, तर सरकार अदानीच्या घरी', असं म्हणावं लागेल. आता हा लढा केवळ धारावीचा नाही तर संपूर्ण राज्याचा आहे. आता तुम्हाला कळलं असेल की, त्या गद्दारांना खोके कुठून पुरवले असतील", असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.
सब भूमी अदानी की : "केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील सर्व प्रकल्प अदानींना देत आहे. मात्र धारावीचा प्रकल्प आम्ही अदानींच्या घशात घालू देणार नाही", असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. "कोरोना काळात आम्ही पात्र-अपात्र भेद पाहिला नाही. सर्वांना सरसकट मदत केली. मात्र आता तुम्ही जे पात्र आहेत त्यांना धारावीत घर देत आहात, आणि अपात्र आहेत त्यांना धारावीबाहेर फेकताय. असा भेदभाव का? असं कराल तर गाठ आमच्याशी आहे", असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात भाजपा नव्हती :उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्र लढ्यात भाजपा कुठेच दिसली नाही. मात्र जिथे खरेदी-विक्री असते, तिथे भाजपा येते. आम्ही पात्र-अपात्र मानत नाही. सर्व व्यावसायिकांना देखील तिथेच जागा मिळाली पाहिजे. चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही, अशी भूमिका धारावीकरांनी घेतली पाहिजे. यातून १०० कोटींचा टीडीआर मिळतोय. टीडीआरचं काम सरकार का करत नाही", असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. "विकास करायचा असेल तर आधी पोलिसांना घरं द्या", अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
हे वाचलंत का :
- धारावीतील लोकांना मत देणारी मशीन म्हणून पाहू नका, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरेंना टोला
- सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, काहीही झालं तरी धारावीकरांना घरं देणार; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
- धारावी पुनर्विकास प्रकल्प भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप