मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरणे हा पूर्वनियोजित कट होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
पूर्वनियोजित कट: सर्वांनी एकत्र पक्ष सोडला नाही. सुरुवातीला 16 जण गेले. त्यानंतर 23 जणांनी पक्ष सोडला. त्यांच्या तक्रारी आधीच आयोगाकडे आहेत. त्यामुळे त्या क्रमाने या तक्रारींची सुनावणी व निकाल लागले पाहिजे. मात्र आता हा निकाल लागला आहे. त्यामुळे हे सगळे कटा कारस्थान करुन ठरवून केले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्या वडिलांचे नाव चोरण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे नाव लावावे. स्वतःच्या वडिलांचे नाव लावावे. त्यानंतर निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
हा गुन्हा ठरेल: ते पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गटासाठी खुले करणे हा गुन्हा ठरेल. कारण सध्या एकही सदस्य अस्तित्वात नाही. महापालिका बरखास्त केलेली आहे. त्यामुळे एकही कॉर्पोरेटर नाही अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी सील काठणे हे चुकीचे ठरेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या व्हिपचा आदेश आपल्याला लागू होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दोन गट वेगवेगळे आहे. निवडणूक आयोगाने ते आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आपल्या गटाला किंवा आपल्याला लागू होण्याचा प्रश्नच नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले की, ते बाहेर पडलेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार आहे. आमच्या डोक्यावर नाही, असेही ते म्हणाले.