मुंबई :बारसू प्रकल्पासाठी प्रस्ताव मी मुख्यमंत्री असताना दिल्याचे सांगत आहेत. परंतु, जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. ते तुमची सत्ता आल्यावर गुजरातला नेले. तुम्हाला महाराष्ट्राची राख, गुजरातमध्ये रांगोळी करायची आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प चांगला आहे तर लोकांवर जोर जबरदस्ती का? काही उपऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्या उपऱ्या लोकांचा वरवंटा आमच्यावर फिरवणार का असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून चढवला.
महाराष्ट्राची नुसती राख करायची का? बारसू रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असे सांगत सत्ताधाऱ्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि भूमिका स्पष्ट केली. नानार प्रकल्प रद्द झाल्यानंतर माझ्या ध्यानी मनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. एकनाथ शिंदेंनी यावेळी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, यासाठी माझ्याकडे आग्रह धरला होता. परंतु रिफायनरी मुळे होणारे प्रदूषण महाराष्ट्रात मला कदापि मान्य होणार नाही, असे मी स्पष्ट केले होते.
राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवले : ज्या ठिकाणी प्रकल्प होऊ शकतो तिकडे हा प्रकल्प घेऊन जावा अशी भूमिका देखील मांडली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर मागच्या सहा ते आठ महिन्यात महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प वेदांता किंवा इतर महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला नेले. परंतु नानारच्या वेळी जी भूमिका मांडली होती त्यावर मी आजही ठाम आहे. आज माझे केवळ पत्र नाचवले जात आहे. परंतु माझ्याच काळात महाराष्ट्रात येणारे प्रकल्प तुम्ही गुजरातला का जाऊ दिले. महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी तुम्हाला करायची आहे का,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.