मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पवारपुढील काही दिवस राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना सिल्वर ओक बंगल्यावर भेटणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
शरद पवारांच्या 2 सुरक्षारक्षकांना कोरोना, संपूर्ण पवार कुटुंबीय क्वारंटाइन होण्याची शक्यता - शरद पवार सुरक्षारक्षक बातमी
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यात आता शरद पवारांच्या ताफ्यातील दोन सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण पवार कुटुंबीयाना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवार यांच्या ताफ्यातील सहा जणांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन सुरक्षारक्षकांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. हे सुरक्षारक्षक पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर आणि त्यांच्या ताफ्यात कायम सोबत होते. मात्र, पवार या सुरक्षारक्षकांच्या फारसे संपर्कात नव्हते. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण पवार कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सिल्वर ओक बंगल्यावर आता पुढील काही दिवस पवार हे राजकीय नेत्यांसह आपल्या कार्यकर्त्यांनाही भेटणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले. रविवारी बारामती येथे होणाऱ्या आपल्या कुटुंबीयांच्या भेटीगाठीचा दौरा पवार यांनी अचानक रद्द करून मुंबई गाठले होते. हा दौरा पार्थ पवार यांच्यामुळे निर्माण झालेल्या वादातून पवारांनी रद्द केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यामुळे यावर पडदा टाकण्यासाठी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक तातडीची बैठक घेण्याचे नियोजन ठरले होते. मात्र, पवार यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकाना कोरोनाची लागण झाली असल्याने पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे याही बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.