मुंबई- मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी रात्री मुंबईत विजांच्या लखलखाटासह हजेरी लावली. यावेळी कांदिवली पोयसर येथे वीज पडून २ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. तुषार झा (वय ११) व ऋषभ तिवारी ( वय १०) असे या मुलांची नावे आहेत.
वीज पडून दोन जणांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मुंबईत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान कांदिवली पोयसर येथील विमला देवी चाळीवर वीज कोसळली. त्यात तुषार झा व ऋषभ तिवारी ही दोन मुले जखमी झाली. त्यांना जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लेखराज यांनी या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
शहरात वडाळा अग्निशमन केंद्र येथे ६ मिलीमीटर, पश्चिम उनगरात मालवणी अग्निशमन केंद्र येथे ५० मिलीमीटर, मालाड अग्निशमन केंद्र येथे ४४ मिलीमीटर, कांदिवली अग्निशमन केंद्र येथे ४९ मिलीमीटर, चिंचोली अग्निशमन केंद्र येथे ३७ मिलीमीटर, के पश्चिम वॉर्ड कार्यालय येथे ४१ मिलीमीटर, गोरेगाव येथे ३७ मिलीमीटर, के पूर्व कार्यालय येथे ३४ मिलीमीटर, दिंडोशी अग्निशमन केंद्र येथे ३४ मिलीमीटर, पूर्व उपनगरात गवाणपाडा अग्निशमन केंद्र येथे ३१, इमारत प्रस्ताव कार्यालय येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मान्सून नसताना ६ पंपाचा वापर -
मुंबईत कुठेही पाणी साचलेले नसले तरी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पश्चिम उपनगरात ६ पंप सुरू करण्यात आले होते. पश्चिम उपनगरात २३ झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.