मुंबई :बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेराला ड्रग्जच्या तस्करीच्या प्रकरणात अडकवल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने दोघांना अटक केली आहे. 32 वर्षीय अँथनी पॉल आणि 42 वर्षीय राजेश दामोदर बोबाटे उर्फ रवी, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना 4 मे पर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहेत. अँथनी पॉल मुंबईतील बोरिवलीचा रहिवासी आहे. तर त्याचा साथीदार राजेश बाभोटे उर्फ रवी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर अभिनेत्रीच्या ट्रॉफीमध्ये दडवून ठेवलेले ड्रग्ज शारजाहला पाठवल्याचा आरोप आहे.
क्रिसनसारखे इतरांनी फसवले आहे : 27 वर्षीय अभिनेत्री क्रिसन परेरा अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली सध्या शारजाहच्या तुरुंगात बंद आहे. क्रिसन परेराने सडक 2 आणि बाटला हाऊस सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तिला फसवण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकार्यांकडून असे समजले की, पॉलने या प्रकरणात अभिनेत्रीची आई प्रेमिला परेरा यांच्याविरुद्ध सूड उगवण्यासाठी ही योजना आखली होती. पॉलने त्याचा साथीदार रवी याच्यासोबत क्रिसनला आंतरराष्ट्रीय वेब सीरिजच्या कथित ऑडिशनसाठी यूएईला पाठवण्याचा कट रचला. विमानतळावर जाताना तिला ट्रॉफी देण्यात आली ज्यामध्ये त्यांनी ड्रग्ज लपवले होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी असेही शोधून काढले की पॉलने क्रिसनसारख्या इतर चार लोकांनाही अशाच प्रकारे फसवले होते.
अभिनेत्रीच्या आईविरुद्ध सूड उगवण्यासाठी रचला कट :पॉल हा मुंबईतील मालाड आणि बोरिवली भागात बेकरी चालवतो. पॉलची एक बहीण त्याच इमारतीत राहते जिथे क्रिसनची आई प्रेमिला देखील राहते. 2020 मध्ये कोविड - 19 लॉकडाउन दरम्यान, पॉल त्याच्या बहिणीला भेटायला गेला होता तेव्हा प्रेमिलाचा पाळीव कुत्रा त्याच्यावर भुंकला आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. स्वतःला वाचवण्यासाठी पॉलने कुत्र्याला मारण्याच्या प्रयत्नात खुर्ची उचलली. हे पाहून प्रेमिलाला राग आला आणि तिने इमारतीतील इतर रहिवाशांसमोर त्याचा अपमान केला. या घटनेचा बदला घेण्यासाठी पॉलने क्रिसनला या प्रकरणात अडकवण्याची योजना आखली.