मुंबई- लोकसभा निवडणुकीत मुंबईत दारुण पराभव झाल्यानंतर काल मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा राजीनामा दिला. त्यांनतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरा यांच्या राजीनाम्यानंतर माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी काल एक वादग्रस्त ट्विट करून देवरा यांची खिल्ली उडवली होती. त्या ट्वीटला भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, असे त्यांनी टि्वटरच्या माध्यामातून म्हटले आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये ट्विटर युद्ध; निरुपम-जगताप वाद पेटण्याची शक्यता - जगताप
मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा राजीनामा दिल्यानंतर संजय निरुपम आणि भाई जगताप यांच्यात ट्विटर युद्ध सुरू झाले आहे. यामुळे दोघांतील वाद पेटण्याची शक्यता आहे.
काल निरुपम यांनी मिलिंद देवरा राजीनामा दिल्यानंतर असे टि्वट केले होते, काही लोक राष्ट्रीय पदासाठी प्रादेशिक पदाचा राजीनामा देतात, अशा कर्मठ लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
जगताप यांनी केलेल्या या ट्विटवर काँग्रेसमध्ये अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असून त्यानंतर निरुपम यावर काय उत्तर देतील हे पहावे लागणार आहे. निरुपम यांच्या या ट्विटमुळे देवरा समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याने आज देवरा विरूद्ध निरुपम असे ट्विट युद्ध जोरात रंगण्याची शक्यता आहे. त्यावर आज निरुपम विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून त्याचे पडसाद ट्विटरच्या माध्यमातून उमटले आहेत.