मुंबई - राज्यात सध्या १९७२ च्या दुष्काळापेक्षा भयावह परिस्थिती आहे. तर, दुसरीकडे दुष्काळ पाण्याचा आहे की नियोजनाचा, असा प्रश्न पडतो आहे. इतका गंभीर दुष्काळ असूनही सरकार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन झटून कामाला लागलेले नाही. दुसरीकडे, जनावरे आणि हजारो कुटुंबे तहानेने व्याकुळ झाली आहेत. राज्यात काही ठिकाणी दोन-तीन दिवसाला तर, काही जिल्ह्यांमध्ये २०-२० दिवसानंतर नागरिकांना पाणी पाहायला मिळत आहे. राज्यातील जवळपास २५ जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर स्थिती असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील काही जिल्ह्यांचा घेतलेला आढावा...
१) बीड - १५ दिवसातून एकदा पाणी
शहराला नगरपालिकेकडून १५ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर, शहरातील गोरगरीब नागरिकांना मात्र नळाच्या पाण्यावरच अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरीकडे नगरपालिकेच्या जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात लिकेज आहेत. त्यामुळे नळाला पाणी आल्यावर पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. माजलगाव प्रकल्पात आज घडीला ७५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला पुढील ४ आठवडे पुरू शकले एवढेच पाणी या प्रकल्पात शिल्लक आहे, असे बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिगोत यांनी सांगितले.
२) वाशिम - १२ दिवसाआड पाणीपुरवठा
वाशिम, रिसोड, कारंजा, शहरात सध्यातरी पाणीसंकट नाही. मात्र, वाशिमला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाच्या पाणी पातळीत घट होत आहे. त्यामुळे पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मालेगाव शहरात 12 दिवसातून नळाला पाणी येते. त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
३) जालना - ८ दिवसाआड पाणीपुरवठा
शहराला सध्या ८ दिवसाआड पाणी मिळत आहे. मागील आठवड्यात २२ दिवसानंतर पाणी आले. निजामकालीन घानेवाडी जलाशयातून नवीन जालन्याला तर जायकवाडी (पैठण) येथून १०० किमी अंतरावरून जुन्या जालन्याला पाणी येते. घानेवाडी जलाशय १ महिन्यांपूर्वीच आटला आहे. पाऊस लांबला तर जालनाकरांवर जलसंकट कोसळण्याची शक्यता आहे.
४) लातूर - शहराला १० दिवसातून पाणीपुरवठा
गेल्या ५ महिन्यांपासून शहराला १० दिवसातून पाणीपुरवठा होत आहे. १५ जूनपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे. लातूर औद्योगिक भवनासह शहराला मांजरा धरणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या हे धरणही मृतसाठ्यात असून यामध्ये १४ दशलक्ष घटमीटर पाणी असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख बामनकर यांनी सांगितले. मांजरा धरणाशिवाय इतर जवळचा पर्यायही नसल्याने गरज पडल्यास १० दिवसाचा ५०० पाणीपुरवठा १५ दिवसावर लांबू शकतो. सुरळीत पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. रुपयांना २ हजार लिटर पाण्याचे टँकर विकत घेण्याची नामुष्की लातूरकरांवर ओढावली आहे.
५) यवतमाळ - शहरात ८ दिवसानंतर पाणीपुरवठा होते.
शहरात ८ दिवसानंतर पाणीपुरवठा होते. जूनअखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीपुरवठा सध्या शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. कुठे आठवड्यातून एकदा तर काही ठिकाणी महिन्यातून दोनदा नळाला पाणी येत आहे. तालुक्याच्या शहरी भागात हा पाण्याचा पुरवठा होत असला तरी, ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई असल्याने प्रत्येकाच्या डोईवर पाण्याचा हंडा हीच परिस्थिती जिल्हाभरात पहावयास मिळतो. जिल्ह्यातील काही भागात तर 'धरण उशाला, आणि कोरड घशाला' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
६) धुळे - ७ दिवसाआड पाणीपुरवठा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात १९.४३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सध्या शहराला ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नकाणे तलावात अक्कलपाडा आणि हरणमाळ तलावातून पाणी सोडून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
७) औरंगाबाद - शहरामध्ये ४ ते ५ दिवसानंतर पाणी पुरवठा
औरंगाबाद - शहरामध्ये ४ ते ५ दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. ग्रामीण भागामध्ये सध्या १ हजाराच्या वर पाण्याचे टँकर सुरु आहेत. दर आठवड्यातून १ ते २ वेळेस पाण्याचे टँकर येत असल्याने पाण्याची भयाण परिस्थिती आहे. ५००० लिटर पाण्याचा टँकर घेण्यासाठी नागरिकांना जवळपास १ हजार रुपये मोजावे लागत आहे.
८) नांदेड - ४ दिवसाआड पाणीपुरवठा
शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात केवळ २ दशलक्ष घटमीटर पाणी उपलब्ध असल्याने शहरवासियांना ४ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळी परिस्थिती व उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शहरातील ७० ते ८० टक्के बोअरवेल आटले आहेत. महापालिकेने आपले हातपंप दुरूस्त केले असले तरी त्यातील बऱयाच हातपंपाला पुरेसे पाणी नसल्याच्या तक्रारी आहेत. भूजल पातळी घटल्यामुळे पॉवरपंप देखील निकामी ठरत आहेत. अशा परिस्थितीत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. नांदेड उत्तर भागाला इसापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. आसना बंधाऱ्यात दर महिन्याला एक दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा उपलब्ध होत आहे. हे पाणी नांदेड उत्तर भागास किमान २० दिवस पुरेल आणि दक्षिण भागासाठी विष्णुपुरी जलाशयातील पाणी उचलून शहरवासियांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विष्णुपुरी जलाशयातील उपलब्ध पाण्याने तळ गाठला असून, तो साठा कधीही संपू शकतो. त्यानंतर मृत्तसाठ्यातून पाणी उचलण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
९) वर्धा - ४ दिवसाआड पाणीपुरवठा
मागील वर्षी पर्यजन्यमान कमी झाल्यामुळे ऑक्टोबरपासूनच शहरात पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. सुरुवातील एक दिवसाआड मिळणारे आता चार दिवसांनी येत आहे. साधारण जून महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे. पण, ग्रामीण भागात पाणी टंचाई आहे. तालुक्याचा विचार केल्यास कारंजा तालुका अनेक वर्षांपासून पाणी टंचाईला समोर जात आहे, इथे 6 ते 8 दिवसातून पाणी मिळत आहे.
१०) सोलापूर - 4 दिवसाआड पाणीपुरवठा
शहरात ४ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सोलापूर शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा होत असून, 110 किलोमीटर लांबवरून पाईपलाईनमधून हा पाणी पुरवठा होतो. उजनी धरणाशिवाय सोलापूर शहरासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही.
११) जळगाव - ३ दिवसाआड पाणीपुरवठा
शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत वाघूरमध्ये केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहराला ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तर, शहरात पाणीबाणी उद्भवू शकते. वाघूर धरणाच्या डाऊन स्कीम व्यतिरिक्त शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी पर्यायी व्यवस्था नाही. वाघूरमधील घटता जलसाठा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात अजून पाणीकपात होऊन पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसाआड होण्याची शक्यता आहे.
१२) रत्नागिरी - शहरात सुरळीत, मात्र, दापोलीत ८ दिवसांनी पाणीपुरवठा