मुंबई- महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत घाटकोपर उच्चस्तरीय जलाशय पाण्याची टाकी क्रमांक 1 चे दुरुस्ती काम पूर्ण झाले आहे. ही टाकी 3 जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटकोपर, कुर्ला विभागात पुढील 15 दिवसतरी गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता पालिकेने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच पाणीकपातीने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई उपनगरात आजही काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे, तर घाटकोपर, कुर्ला, भांडुप भागातील डोंगर उतारावरील भागात कमी दाबाने पाणी रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर येते. त्यामुळे अगोदरच उपनगरातील नागरिक हैराण असून त्यात गढूळ पाणीपुरवठा 15 दिवस होणार यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. यासंदर्भात, पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना 3 जून ते 18 जूनपर्यंत पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
या भागांना होणार गढूळ पाणीपुरवठा -
एल विभागातील प्रभाग क्रमांक 157 ते 161 व 164 मधील संघर्ष नगर, खैराणी रोड दोन्ही साईड, सरदार कंपाऊंड, डिसुझा कंपाऊंड, अयप्पा मंदीर मार्ग, लक्ष्मी नारायण मंदीर मार्ग, यादवनगर, राजीवनगर, अहमद रजा मार्ग, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, लोयल्का कंपाऊंड, सुभाष नगर, बारदान गल्ली, इंदिरानगर, मोहिली पाईपलाईन, परेरा वाडी, गणेश नगर, नारायण नगर, नारी सेवा सदन मार्ग, भीमनगर, आंबेडकर नगर/ साने गुरुजी नगर, सुंदरबाग, वाल्मिकी नगर, अशोक नगर, हिमालया सोसायटी, संजय नगर, समता नगर, गैबंशा स्कूल, नुराणी मस्जिद, गरीबी हटाव नगर, मुकुंद कंपाऊंड
एन विभागातील प्रभाग क्र. 123, 124, 126 ते 123 मधील आनंदगड, शंकर मंदीर, रामनगर, हनुमान मंदीर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षा नगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर टँक, डी & सी महापालिका वसाहत, रायगड विभाजी, गांवदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर २, अमिनाबाई चाळ, काठोडी पाडा, भिम नगर, इंदिरा नगर 1, अल्ताफ नगर, गेलदा नगर, जब्लुशा नगर, गोलीबार रोड, सेवा नगर, ओएनजीसी वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी गेट नगर 2 व विक्रोळी पार्क साईडचा अंशत: भाग (म्हणजे आनंदगड उदंचन केंद्राद्वारे होणारा पाणीपुरवठा) सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि रोहिदास रोड इत्यादी.
त्यामुळे पुढील पंधरा दिवस पाणीपुरवठ्यात गढूळता आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.