मुंबई - मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील तुळशी तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे. तो लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांची पाण्याची तहान मिटली आहे आणि त्यांना दिलासा मिळाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक तुळशी तलाव आहे. या तलावाची पाणी भरण्याची एकूण पातळी १३९.१७ मीटर एवढी उंचीची आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंत १३७.०१ मीटर एवढी पाण्याने पातळी गाठली आहे. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास शुक्रवारपर्यंत हा तलाव पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ९ जुलै रोजी हा तलाव भरला होता.
मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३७५० दशलक्ष अर्थात ३७५ कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. यामध्ये भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो.
यावर्षी जून महिन्यात पाऊस झाला नाही. मात्र, जुलै महिन्यात सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे तलावात पाणीसाठा वाढतो आहे. यात तुळसी तलावातील पाण्याचा साठा काठोकाठ भरला असल्याने तो लवकरच ओव्हरफ्लो होऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. गुरुवारी सकाळपर्यंत तलावांमध्ये ३८ टक्के एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. आतापर्यंत सातही तलावांमध्ये मिळून ५ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
मागील काही वर्षांपासून असलेली पाण्याच्या साठ्याची आकडेवारी
वर्ष पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
२०१९ ५४७५६९
२०१८ ५८०७९०
२०१७ ६९५५५४
मुंबईतील सातही तलावातील पाणीसाठा आणि टक्केवारी