मुंबई- मुंबईवर मागील पंचवीस वर्षांपासून सत्ता गाजविणाऱ्या शिवसेनेची आपला पारंपरिक गड असलेल्या वांद्रे पश्चिम या मतदारसंघात पहिल्यांदा आपल्याच आमदाराच्या बंडखोरीने डोकेदुखी वाढली आहे. यामुळे मातोश्रींचे अंगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदार संघात सेनेची केविलवाणी अवस्था झाली असल्याचे आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिसून आले. या मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून कायम दबदबा असलेल्या माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनीच मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला आव्हान दिले आहे.
यामुळे सेनेच्या पायाखालची वाळू सरकत आहे म्हणूनच सेनेने काल (शुक्रवार) तृप्ती सावंत यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर करून आपली डोकेदुखी कमी होईल यासाठीचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांमध्ये बाळा सावंत यांच्या पत्नी म्हणून तृप्ती सावंत यांच्याकडेच प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा ओढा असल्याने सेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत सेनेने आपले आंगण सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी ताकद लावली आहे.
मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांनी हा गड आपल्याकडे कायम ठेवला होता. परंतु मध्येच त्यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु येथील शिवसैनिकांनी तृप्ती सावंत यांना मोठ्या मताने विजयी करून बाळा सावंत यांच्याबद्दलची निष्ठा स्पष्ट केली होती. आता शिवसेनेने या मतदारसंघात बाहेरून उमेदवार लादला असल्याने त्याबद्दल येथील शिवसैनिकांमध्ये मोठे नाराजी पसरली असून त्याचा मोठा फटका सेनेला बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत